“अरे श्रेयस काय ठरवलं आहेस भारतात यायचं? सव्वा वर्ष होऊन गेलं !”

“आई, ठरवायला वेळ नव्हता.आणि काहीच नक्की नव्हतं कधी सुट्टी असणार आहे”

“पण त्या नादात किती उशीर झालाय, तिकिटं वाढली असतील खूप. त्यामुळे cancel करू नको अजिबात”

“बघू !”

अगदी नोव्हेम्बरमध्य पर्यंत अशी चालढकल केल्यावर जेव्हा मी finally विमान तिकिटं काढायची ठरवली तोपर्यंत ती जबरदस्त महाग झालेली. डायरेक्ट तिकीट सोडाच, stopover घ्यायचा म्हंटलं तरी नेहमी पेक्षा दुप्पट किंमत. न जाणं हा काही पर्यायच नव्हता. दीड वर्षांनी जाऊन कधी एकदा भाकरी, पुरणपोळी, भेळ, मिसळ वगैरेत वर ताव मारतोय असं झालेलं. पण मी हार मानणार नव्हतो. (मी काही अगदी “फुकट ते पौष्टिक” वाला नाही पण €१४०० च तिकीट काढताना हात पण आपोआप मागे जातो!) थोडं इकडे तिकडे शोधल्यावर मला एक तिकिट सापडलंच! तारखा जुळत होत्या, दर सुद्धा रास्त होता, पण…

Airline : EgyptAir

— ऑ , हे कोणे? असो इजिप्त सरकार चं आहे तर चांगलं असेल.

Layover : 22 Hrs

मला वाटलं webpage गंडलं. २.२ तास वगैरे असेल. होतं असं कधी कधी. मी पेज रिफ्रेश केलं.

Layover : 22 Hrs

— काय !!!!! हे वेडे झालेत का? २२ तास काय उंट बघत बसायचं का?

idea झुरळासारखी झटकून टाकायच्या आधी मी जरा tripadvisor वर जरा संशोधन केलं. कोणीतरी सुज्ञ प्रवाशाने त्याच्या अशाच मोठ्या layover बद्दल लिहिलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की जरी कुठे लिहिलं नसलं तरी EgyptAir ६ तासा पेक्षा मोठ्या layovers ना हॉटेल आणि खायची व्यवस्था करतं. दुसऱ्या एकाने सांगितलेलं कि त्याने ट्रिप पण केली तेवढ्या वेळात! मी लगेच फोन लावला. Frankfurt विमानतळावरचा त्यांच्या माणसाने पण मला हॉटेल ची खात्री दिली. वर २ चेक-इन बॅग न्यायची परवानगी. एवढं पुढे आलोच आहे तर म्हंटलं घ्यावी आपण पण रिस्क आणि करावं बुकिंग. फार फार तर विमानतळावरच्या कुठल्यातरी बाकावर झोपायला लागेल. पण सगळं जमून आलं तर मस्त कैरो बघून होईल. मग काय, होऊ दे खर्च!

कैरो ला लँड होताना


EgyptAir एक निराळीच airline निघाली. Emirates आणि Qatar Air ने त्यांचा सगळा बिझनेस “हब” या संकल्पनेवर बेतला. idea एकदम सोपी :- अमेरिका, युरोप वरून येणारी विमानं दुबई आणि कतार मध्ये थांबतात. काही तास स्टॉप घेऊन प्रवासी लगेच दुसऱ्या विमानांनी आशिया मध्ये. तेल स्वस्तात मिळाल्याने विमान चालवायचा खर्च पण कमी. या मुळेच दुबई एअरपोर्ट हा जगातला सगळ्यात मोठा “हब” एअरपोर्ट झाला. EgyptAir ला पण तसलच काहीतरी करावंसं वाटलं असावं, पण त्यांना तितकंसं यश आलेलं दिसत नाही. यांच्याकडे खूप विमानं आहेत, पण मी ज्यातून प्रवास केला ती सगळी जुनी, बुरशी आलेली, कधी हि पडतील (!) अशी होती. अक्षरशः जीव मुठीत घेऊन होतो मी. In Flight Entertainment म्हणून जुन्या वोल्वो बस सारखं समोर टीव्ही वर चित्रपट लावून ठेवलेला. बरं अगदीच बंडल म्हणावं तर जेवण आणि service एकदम छान. Business क्लास च्या प्रवाश्यांना असते तशी Kit Bag सुद्धा देतात हे.

कैरो विमानतळ तर खूप मोठा आहे. आमचं विमान लँड झाल्यावर मोजून अर्धा तास नुसतं टॅक्सी करत होतं. विमान थांबल्यावर बस ने अजून १५ मिनिटं इकडे तिकडे फिरवलं. मला वाटलं झाली आपली कैरो टूर! शेवटी रात्री ७ वाजता मी विमानतळात पाऊल ठेवलं. त्याला विमानतळ म्हंटलं म्हणेज जरा जास्तच झालं, मोठा बसस्टॊप च! बसायला जागा कमी, लोकं सगळीकडे अगदी अंथरूण टाकून पसरलेली. एअरपोर्ट वर चालू wifi नाही, माझं Dutch /German कुठलंच सिमकार्ड चालत नाही त्यामुळे बाहेरील जगाशी संपर्क पण नाही. माझी connecting flight दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ५ ला. मला वाटलं सलिपींग बॅग आणायला हवी होती! मी धीर करून थेट EgyptAir च्या काउंटर वर च हॉटेल स्टे च विचारलं. दोन चार वेळा इकडून तिकडे पाठवल्यावर शेवटी त्यांच्या एका कर्मचाऱ्याने मला सगळी process सविस्तर सांगितली. माझा boarding pass आणि पासपोर्ट EgyptAir त्यांच्या कडे ठेवून घेणार आणि आम्हाला बाहेर एका हॉटेल वर घेऊन जाणार. तिकडे तुम्ही तुमची flight येई पर्यंत एका रूम मध्ये राहायचं, जेवण, breakfast वगैरे included! अगदी चकटफू! तुम्हाला पाहिजे तर आराम करा, किंवा मस्त कैरो फिरा!

मला त्या क्षणी हा सगळा झोल तर नाही ना असा वाटलं! पण त्याने सांगितलं की ती बाकीची पसरलेली मंडळी पण याचीच वाट बघत आहेत! मी लगेच trip च पण विचारलं! EgyptAir ची स्वतःची Travel Company सुद्धा आहे: Karnak नावाची. याच कंपनी च्या तर्फे वेगवेगळ्या टूर्स प्लॅन केल्या जातात. तुमच्या layover प्रमाणे तुम्ही तुम्हाला आवडेल ती टूर बुक करायची. ( दुसऱ्या कंपनी सोबत पण करू शकता, पण मी recommend नाही करणार) मला Pyramids आणि Sphinx ची टूर चांगली वाटली. $७० एकाला, $४० जर अजून ३ जण मिळाले तर. आणि तेव्हाच मला माझ्या सारखाच विचार करून आलेले (आणि मुंबई लाच जाणारे!) ३ मित्र भेटले! आम्ही लगेच पैसे भरले. रात्री ११ ला शेवटी सगळ्यांचे “papers” आले. (म्हणजे हॉटेल च्या बुकिंग ची print!) त्यांचा माणसाने आम्हाला कुठल्यातरी बाजूच्या दरवाजाने बाहेर काढलं आणि आम्ही इजिप्त मध्ये पाऊल ठेवलं! एका van मध्ये आम्हाला कोंबलं आणि आम्ही निघालो हॉटेल कडे!

कैरो विमानतळ शहराच्या बराच बाहेर आहे. कार ने जायला १ तास वगैरे लागतो. नॉर्मली विमानतळा जवळचं Radisson BLU वगैरे असतं, पण त्या दिवशी खूपच गर्दी होती म्हणून त्यांनी आमची व्यवस्था एका लांबच्या हॉटेल मध्ये केलेली. रात्री च्या अंधारात फार काही कळलं नाही, पण traffic वगैरे प्रकरण भारतासारखं च वाटत होत. थंडी चे दिवस असले तरी युरोप च्या तुलनेनं गरम च हवामान होतं! हॉटेल वर पोचलो तेव्हा १२ वाजून गेले होते, तरी सुद्धा त्यांनी आमच्या साठी डिनर ची व्यवस्था करून ठेवली होती. जबरदस्त भूक लागली होतीच! मस्त इजिप्तशिअन आणि युरोपियन खाद्यपदार्थांवर ताव मारून मी finally माझ्या रूम वर जाऊन पडलो!

Desserts in Desert

सकाळी ७.३० वाजता आमच्या टूर ची गाडी येणार होती, जी अपेक्षेप्रमाणे ८ वाजता आली. आम्ही न्याहारी करून तयारच होतो. टूर गाईड नंतर जॉईन होणार असल्याने आमचा ड्राइवर त्याच्या मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये आम्हाला कैरो ची माहिती देत होता. आजूबाजूला सिमेंट आणि विटांनी बनलेल्या पण बोडक्या इमारती. रंगकाम वगैरे नाहीच, सगळीकडे नुसती रेती. वाळवंट काय असतं हे पहिल्यांदाच बघितलं मी! ड्राइवर ने आम्हाला चांगलंच बजावून ठेवलेलं. कोणत्याही अमिषाला भुलू नका. पिरॅमिड दाखवतो किंवा Antiques देतो म्हणून खूप पर्यटकांना लुटतात. त्यात आमच्या कडे पासपोर्ट्स नाहीत आणि भाषा हि येत नाही. इजिप्त मध्ये राजकीय वातावरण सुद्धा फार ठीक नाहीए. मध्ये मध्ये आतंकवादी हल्ले होत असतात. माझी ट्रिप झाल्यावर ३-४ आठवड्यांनी एका टुरिस्ट बस वर बॉम्बहल्ला झाला होता. त्यामुळे काळजी घेणं अत्यावश्यक. उत्तम ट्रिप ऑरगॅनिझर्स असणं फारच महत्वाचं आहे.

नाईल नदी

कैरो मुख्य शहर मात्र म्हणज इस्लामी स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. तहरीर चौक भाग, जिकडे काही वर्षापूर्वी अरब क्रांती ची निदर्शने झाली होती, एकदम आपल्या दिल्ली सारखा वाटला! कैरोची जीवनदायिनी नाईल नसती तर त्या वाळवंटात राहण्याचं धाडस कोणीच केलं नसतं! नाईल नदी लांबीने जगातील सगळ्यात मोठी आहेच, पण रुंदी ने पण काही कमी नाहीए. नदी च्या दोन्ही बाजूला कैरो वसलं आहे आणि गिझा (पिरॅमिड चा भाग) जरा दूर आहे. आमचा खरा गाईड नाईल च्या पुलावर भेटला, ज्याचं नाव कमल! (at least मला तरी तसं ऐकू आलं!). त्याने इतिहासात मास्टर्स केलं होत! पण लोकांना गाईड करायला आवडतं असं म्हणाला. ( आणि बहुतेक जास्त पैसे हि मिळत असावेत!) त्याने आम्हाला अगदी नीट माहिती द्यायला सुरवात केली.

इसपू ३००० पासून अस्तित्वात असलेलं जगातलं सर्वात जुनं शहर! पुरातन इजिप्त चा इतिहास सर्वश्रुत आहे आणि फेरो आणि त्यांच्या Mummies हा खूपच रोचक विषय आहे. अगदी आजदेखील पुरातत्व खात्याला नवीन अवशेष मिळत असतात, ज्यामुळे इतिहासातल्या अनेक गोष्टींची नव्याने उकल केली जाते! National Geographic ने तो खूप चांगल्या पद्धतीने सांगितला आहे, आणि तो नक्की बघाच! पण त्या नंतरचा इतिहास सुद्धा तितकाच रंजक आहे. पूर्व रोमन साम्राज्य कोसळल्यावर इजिप्त वर अरबांचे राज्य आले. त्यांचा प्रभाव वाढत गेला आणि कैरो अरब साम्राज्य ची अनभिक्त राजधानी झाली! १८६९ साली जेव्हा सुएझ कालवा पूर्ण झाला तेव्हा ब्रिटिशांची वक्रदृष्टी इजिप्त वर पडली. पण आपल्यासारखं साम, दाम, दंड, भेद पर्यंत त्यांनी जाऊ नाही दिलं. नामधारी सुलतानाच्या मदतीने त्यांनी राज्य केलं. त्या मूळेच इजिप्त मधील अनेक पुरातन गोष्टी आता British Museum आणि Louvre मध्ये आहेत. एवढं असून सुद्धा कैरो संग्रहालय आजही भेट देण्या सारखं आहे. पण मी गेलो तेव्हा ते बंद होतं. आमचा गाईड म्हणाला जपान च्या मदतीने नवीन संग्रहालय बांधणं चालू आहे आणि ते लवकरच उघडेल!

आम्ही थेट पायरॅमिड्स चा इकडे गेलो. ३ मुख्य पिरॅमिडस आणि आणि अनेक छोटे पिरॅमिडस हे १६३ किलोमीटर क्षेत्रफळात पसरले आहेत. १४७ मीटर उंच खुफू चा पिरॅमिड (Great Pyramid of Giza) अनेक वर्ष जगातील सर्वात उंच इमारत होती. जगातील ८ आश्चर्यापैकी एक असूनही त्याच्या ढिसाळ देखभालीने मला आश्चर्यचकित केलं! पिरॅमिड वर चढायला बंदी आहे, पण थोडे पैसे असतील तर काहीही सहज शक्य आहे! पिरॅमिड चे दगड आणि त्यांच्या पासून बनवलेल्या गोष्टी सुद्धा दुकानात विकत मिळतात! गिझा भाग खूप मोठा आहे, त्यामुळे आत सगळे कार, घोडे किंवा उंटावरून फिरतात. पिरॅमिड च्या आतील भागात अनेक रहस्य आहेत, पण पर्यटकांना बघण्यास परवानगी असलेल्या भागात फार काही नाहीए. आम्हाला वेळ पण नव्हता, म्हणून आम्ही त्याला टांग दिली. स्फिंक्स च्या बाजू ला रात्री मस्त लेसर शो असतो, पण तो ही राहिला. आणि हो! पिरॅमिडस च्या समोर खरंच Pizza Hut आहे !

पिरॅमिड आणि स्फिंक्स

पुढचा स्टॉप होता अत्तर संग्रहालय. संग्रहालय कसलं, दुकान च होतं ते. गेल्या वर लगेच आमचं इजिप्तशिअन पद्धतीने स्वागत झालं. कडक उन्हातून चालून आलेल्या पाहुण्याला चहा/सरबत विचारायची पद्धत आहे. खास करून जास्वंदी च थंड सरबत ( Hibiscus tea), जे आम्ही प्यायलं! (बाय द वे, आपण जसे शेंगदाणे खातो, तसे हे एजिप्तीयन्स भोपळ्याच्या बिया खात असतात सारखे!) इजिप्त मध्ये बऱ्याच नामांकित brands चे (न नामांकित!) परफुम्स बनवतात. आणि त्याचेच १५ वगैरे प्रकार आम्हाला दुकानदाराने दाखवले (आणि खपवयचा प्रयत्न केला). नंतर आम्ही पपायरस संग्रहालय / दुकानात गेलो. तिकडे आम्हाला पपायरस च्या फांद्या पासून इजिप्तशिअन्स कागद कसा बनवायचे, कसा रंगवायचे, त्यांची प्रतीकं अशा गोष्टी सांगितल्या. कुशल कारागिरांनी सुंदर रंगकाम केलेली चित्रं विकायला ठेवली होती. इजिप्त ची Economy इतकी खराब झाली आहे कि त्यांच्या दृष्टीने सर्वात महाग गोष्टी सुद्धा आपल्याला स्वस्त वाटतील! मला आवडलेल्या काही चित्र आणि वस्तू घेऊन आम्ही बाहेर आलो.

पपायरस संग्रहालय
कलाकुसर!

एवढं सगळं होई पर्यंत १ वाजलाच होता. आम्हाला परत मुंबई ला जायचं विमान पकडायच आहे हे विसरून च गेलो होतो! आम्ही सर्व हॉटेल वर परत जाऊन जेवण करून तयात झालो. २ वाजता EgyptAir ची गाडी आली आणि आम्हाला विमानतळावर घेऊन गेली. विमानतळ सुरक्षा तर गम्मत च होती . बॅग चेक करणारा पोलीसच विमानतळाच्या आत सिग्रेट फुकत बसलेला. विमानात द्रव्य पदार्थ घेऊन जायला सामान्यतः खूप restrictions असतात. इकडे liquids च सोडाच, गॅस सिलेंडर न्यायला पण फार काही problem आला नसता! (मजेत म्हणतोय हं मी हे, उगाच प्रयत्न वगैरे करू नका, इजिप्त मध्ये अडकलात तर खूप त्रास देतात असं पण ऐकलं आहे मी!)

कैरो वरून टेकऑफ करताना

Customs ने मला माझा पासपोर्ट परत दिला तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला! इजिप्त चा कुठेही स्टॅम्प नाही! कोणाला सांगितलं तर खरं पण वाटणार नाही कि मी इजिप्त ला जाऊन आलो! कदाचित इजिप्त च्या लुप्त संस्कृती सारखंच ह्यात सुद्धा काहीतरी गूढ असावं! विमानाने टेकऑफ केल्यावर वाळवंट हळू हळू दिसेनासं झालं, तरी इजिप्त नावाचं मृगजळ मात्र मनात बराच वेळ राहिलं !