I am sorry my Anglophonic friends, this post is going to be in my native language, Marathi. I won’t recommend using google translate, it might end up in something weird and eerily funny! But if you don’t mind or just want to see the beautiful pictures, go ahead!

म्युनिक आणि पुण्यात काहीतरी जबरदस्त साम्य आहे. दोन्ही ऐतिहासिक वारसा असलेली व अनेक लढायांची साक्षीदार ठरलेली ठिकाणं. स्वतःच्या शहराबद्दल, भाषेबद्दल, इतकाच काय तर पाण्याबद्दल जाज्वल्य अभिमान असलेली माणसं. दुपारी १-४, रविवारी दुकानं बंद म्हणजे बंद ठेवणार. लोकांचे स्वभाव सुद्धा पेठेतल्या आजोबांसारखे. उपनगरांमध्ये गेलं तर प्रभात रस्त्या वर चालल्या सारख वाटतं.आखीव रेखीव बंगले, गॅरेज मध्ये गाडी, अंगणात फुलझाडं , लिस्ट मोठी आहे.

तर अश्या गावात १५ दिवस राहायचा योग् आला तो माझ्या summer school मुळे. आलो तो दिवस रविवार चा. पहिल्याच दिवशी म्युनिक च्या पाहुणचाराचा प्रसाद मिळाला मला! आम्ही राहत होतो Neufarn नावाच्या उपनगरात. इकडे सगळी दुकानं बंद! अगदी हॉटेल मधलं रेस्टऑरेंट पण बंद! खाऊ काय या प्रश्नाला सिटी सेंटर मध्ये काहीतरी मिळेल असा उत्तर! सिटी सेंटर ला जायचं तर अर्धा तास चालायचं, ४५ मिनिट ट्रेन, आणि मग १५ मिनिट मेट्रो किंवा चालत ! “खाण्यासाठी भटकत जरी दूरदेशी फिरेन” या उक्ती चा प्रत्यय आला ! मी आणि माझे मित्र निघालो मग, उदरभरण करायला !( आणि फिरायला!)

मेट्रो आणि रस्ते (गर्दी नसलेल्यावेळी घेतलेला फोटो)

म्युनिक शहरातली वाहतूक व्यवस्था (खरंतर सगळ्याच जर्मन शहरांमधील) खूप कार्यक्षम आहे. उ-बान (मेट्रो) , एस- बान (लोकल), ट्राम, बस यांच्या जाळ्यामुळं कुठूनही कुठे पण जाणं अतिशय सहज. जागोजागी तिकीट मशीन्स ठेवलेली. Single journey, day ticket, group discount असे विविध पर्याय उपलब्ध. एक तिकीट घेतलं की सगळी कडे प्रवास करता येतो. (अश्या सुंदर सिस्टिम्स सगळ्या युरोप मध्ये आहेत ). मोठ्या मोठया कार कंपन्यांची पंढरी असलेल्या जर्मनीत घरटी एक कार तरी असतेच. पण गावात कार चा वापर केला तर भयंकर ट्रॅफिक जॅम. आमच्यासाठी organizers ने एकदा एक बस सिटी टूर प्लॅन केली होती. ती बस १ तास उशिरा आली. ( जर्मनी मध्ये एक तास उशीर म्हणज कहर ). ड्राइवर म्हणाला चालत गेलात तर लवकर जाल! आमची टूर गाईंड बिचारी फोटो दाखवून ठिकाणं सांगायला लागली! जर पुण्यात वाहतुकीचा प्रश्न सोडवायचा असेल तर सक्षम आणि well connected सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हवीच ! आणि त्याचसाठी राज्यकर्त्यांनी जर्मनी कडून नक्कीच टिप्स घ्याव्यात.

Isar नदी

पुण्यात जशी मुळा -मुठा आहे, तशीच म्युनिक मध्ये Isar नदी आहे. तिच्या काठी निवांत पहुडणे हा म्युनिक मधील लोकांचा आदर्श रविवार. अनेक जण मित्र-मैत्रिणी किंवा घरच्याबरोबर पिकनिक साठी इकडे येतात. काही उत्साही मंडळी प्रवाहात surfing वगैरे करत असतात. चौपाटी वर करायचे सगळे उद्योग ( खाणे, पिणे , सनबाथ घेणे वगैरे ) नदीकाठी करत दुधाची तहान ताकावर भागवतात. नदीकाठीच “इंग्लिश गार्डन” नावाच अतिशय मोठं आणि प्रसिद्ध उद्यान आहे. म्युनिक मध्ये जागेची कितीही मारामार असली तरी त्यासाठी बागेसारख्या मोकळ्या जागा बळकावणं हे त्यांच्या रक्तात नाही.

नाक्यावर फेरारी !

म्युनिक शहर बव्हेरिया या प्रांताची राजधानी आहे. इथे जर्मन नाही तर बायरिश बोलतात ! “जर्मनी मधील सर्वात श्रीमंत” अशी याची ख्याती. छोट्या गल्ली बोळात महागड्या सुपरकार्स अशाच पार्क केलेल्या दिसतील. विद्येची श्रीमंती देखील तितकीच जास्त ! जुन्या आणि जगभर नावाजलेली अशी अनेक विद्यापीठं एकट्या म्युनिक शहरात आहेत. ऐतिहासिक वारसा सुद्धा भरभरून लाभला आहे! अनेक महाल,राजवाडे, संग्रहालयं म्युनिक च्या आजूबाजूला आहेत. डिस्ने च्या लोगो मध्ये असलेला “Neuschwanstein” किल्ला पण इथलाच!

Residenz राजवाडा

मी मला मिळालेल्या कमी वेळात दोनच संग्रहालयांना भेट देऊ शकलो. एक म्हणजे Munich Residenz राजवाडा आणि त्याच संग्रहालय. बहुतेक सगळ्या म्युनिक ला पुरून उरतील इतकी चिनीमातीची भांडी इकडे आहेत! त्या काळी याचं फॅड होत म्हणे! दुसरं म्हणजे “BMW Museum”. मॉडर्न संग्रालय कसं असावा याचा आदर्श म्हणजे हे. कारवेड्या माणसाला तर जत्रेत आल्याचा फील येतो. BMW च्या पहिल्या ते अजून प्रकाशित ना झालेल्या मॉडेल्स तर इथे आहेतच , पण या सर्व मॉडेल्स चा इतिहास अगदी चालल्या बोलत्या स्वरूपात मांडला आहे. BMW च्या विशिष्ट इंजिनामधला आवाजाचा फरक असो वा नंबरप्लेट लटकावून तयार केलेला 3D लोगो असो, सगळंच प्रेक्षणीय आहे.

BMW संग्रहालय

आमच्यासाठी organizers ने एक दिवस साग्रसंगीत बायरिश dinner चा बेत आखला. अगदी मास्टरशेफ सारखं सूप, स्टार्टर्स, मेन कोर्स आणि डेसर्ट, प्रत्येकाचे किमान ६ पर्याय.आक्ख्या आयुष्यात मी कधी एवढा बटाटा खाल्ला नसेल तेवढा त्या दिवशी खाल्ला! पण सर्वच अतिशय स्वादिष्ट. अशा मस्त बेताबरोबर एक फ़ुटबाँलचा डाव बघायला कोणाला आवडणार नाही! माझ्या दुर्दैवानं मी गेलो तेव्हा जर्मनी वर्ल्ड कप च्या बाहेर गेलेलं. चेहरे पाडून दुसऱ्या देशांच्या matches बघणारे जर्मन्स बघून मलाच कीव आली.

म्युनिक चा विषय निघाला आणि बिअर बद्दल बोललो नाही तर मलाच पाप लागेल! पुणेकरांसाठी बाकरवडी तीच म्युनिक साठी weissbier आणि चितळे म्हणजे यांच Hofbräuhaus. पार्कात बसून बुधले च्या बुधले कसे संपवतात याच मलाच आश्चर्य वाटतं. यांची बिअर बनवण्याची पद्धत मात्र खूपच शाश्त्रशुद्ध. सर्वात खोल असलेलं अतिशय शुद्ध पाणी हे फक्त मद्यासाठी वापरतात. इतकं कि, जुन्या काळी दूषित पाणी पिऊन साथीचे आजार होण्या पेक्षा लोकं फक्त बियर च पीत. बहुतेक म्हणूनच महिनोन्महिने पाण्याच्या थेंबालाही स्पर्श न केलेल्या लोकांच्या दंतकथा अजूनही ऐकिवास येतात!

म्युनिक शहराच्या वेशीपलीकडे

माझ्या म्युनिकवारी मध्ये मला अनेक चांगले वाईट अनुभव आले. तसं बघायला गेलं तर पुण्यात आणि म्युनिक मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. इथली स्वच्छता, शिस्त, वक्तशीरता कधी पुण्यात येईल माहित नाही. पुण्याच्या खवय्येगिरी ला जर्मन खाद्यपदार्थांची काडीइतकी पण सर नाही. पण म्युनिक मध्ये गेल्यावर काही क्षणासाठी का होईना, मला पुण्याची आठवण झाली, म्हणून हा लेखप्रपंच!